श्री सुहास सोहोनी
कवितेचा उत्सव
☆ 😳 ताळेबंद 😀 ☆ श्री सुहास सोहोनी ☆
आयुष्याच्या ताळेबंदात
ॲसेटस् किती
नि लायबिलिटीज् किती
निरखुन पाह्यलं तेव्हा कळलं
कशी झाल्येय दारुण स्थिती …
ताळेबंद जुळतच नव्हता
दोन्ही बाजूत फरक होता
मालमत्तेच्या मूल्यापेक्षा
जबाबदाऱ्या जास्त होत्या …
पुण्यकर्मे पापकृत्ये
पुन:पुन्हा ताडून पाहिली
एकमेका छेद जाउनी
बाकी त्यांची शून्य राहिली …
डोके पिकले विचार करता
तोच बोलले कोणी काही
कसा जुळावा ताळेबंद
“अखेर शिल्लक” धरलीच नाही …
😨ओह्, अखेर शिल्लक !!!😳
झोळीत शिल्लक काय माझ्या
ज्याचे ओझे जड होते
आप्त स्वकीय मित्रांच्या ते
निस्सिम प्रेमाचे होते …
प्रेमाच्या निरपेक्ष भावना
फेड तयांची कशी करावी
बहुमोलाची ठेव जणू ही
जबाबदारी कां मानावी …
आनंदाच्या ऋणातून या
कधी न वाटे व्हावे मुक्त
“अखेर शिल्लक” वर्धित व्हावी
स्वकीय मित्रांच्या स्नेहात …
माथ्यावरती सदैव पेलिन
प्रेमाचे हे वैभव संचित
लाख लाख मोलाची ठेविन
“अखेर शिल्लक” या झोळीत …
© सुहास सोहोनी
दि. २२-२-२०२४
रत्नागिरी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈