श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 227
☆ किंमत… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
वडा-पाव हा कुणा चहा तर कुणास बुर्जीवाला
रस्त्यावरती भूक लागता आठवतो मग ठेला
*
कुणास शंभू कुणा राम तर कुणा बासरीवाला
प्रत्येकाचा ईश्वर आहे काळजात बसलेला
*
थांबत नाही कुणीच आता सूर्याच्या थाऱ्याला
हवे कुणाला कोकम सरबत कुणास कोका कोला
*
बालपणीचा बंधू असतो प्रिय हो ज्याला त्याला
लग्नानंतर आवड बदलते प्रिय वाटतो साला
*
शेतामधला वळू मोकळा धूळधाण करण्याला
अन कष्टाळू बैल बिचारा बांधतोस दाव्याला
*
पाठीवरती ओझे वाही गाढव म्हणती त्याला
त्याच्यावरती प्रेम करावे वाटे कुंभाराला
*
मी छोटासा महत्त्व माझे इथे नसे कोणाला
खुंटा आहे म्हणून किंमत आहे या जात्याला
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈