सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर
कवितेचा उत्सव
☆ थोरवी स्त्रीत्वाची… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆
☆
माऊलीच्या ममतेची
तिच्या असीम त्यागाची
स्वाभिमानी बाण्याची
थोरवी ही स्त्रीत्वाची
*
कधी वज्रापरी कठोर
कधी कुसुम कोमला
बनते ती रणरागिणी
शुभांगी ही चित्कला
*
माता भगिनी तनया
भार्या होतसे प्रेमला
मनी मायेचा पाझर
प्रेम स्वरुप वत्सला
*
संस्कारित पिढी घडवी
कुटुंबाचा होई आधार
संसाराचा रथ चालवी
होऊनिया ती सूत्रधार
*
अर्थार्जन नी संसाराची
करते कसरत सारी
घास मायेने भरवते
अन्नपूर्णा साक्षात् खरी
*
जुनी जोखडे रुढींची
हसतची तिने तोडली
अस्मितेचे पंख लेवूनी
झेप नभांगणी घेतली
*
सारी क्षेत्रे पादाक्रांत
करी लीलया यशोयुता
देशासाठी लढणारी
हीच असे तेजान्विता
*
शक्तीरुपिणी चिद्शक्ती
अवतरते तिच्या रुपाने
भूषवावे सदैव तिजला
सन्मानाच्या वर्तनाने
*
नित करुया आपण
जागर गं स्त्रीशक्तीचा
पूज्य भाव असो मनी
थोर स्त्रीत्व जपण्याचा
☆
© वृंदा (चित्रा) करमरकर
सांगली
मो. 9405555728
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈