श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 228
☆ भूमिका* अनलज्वाला ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
सर्व निजानिज झाल्यानंतर निजते बाई
सूर्य उगवण्या आधी रोजच उठते बाई
*
चारित्र्याला स्वच्छ ठेवण्या झटते कायम
कपड्यांसोबत आयुष्याला पिळते बाई
*
चूल तव्यासह भातुकलीचा खेळ मांडते
भाकर नंतर त्याच्या आधी जळते बाई
*
ज्या कामाला किंमत नाही का ते करते ?
जो तो म्हणतो रिकामीच तर असते बाई
*
सासू झाली टोक सुईचे नवरा सरपण
रक्त, जाळ अन् छळवादाने पिचते बाई
*
तिलाच कळते कसे करावे गोड कारले
कारल्यातला कडूपणाही गिळते बाई
*
पत्नी, मुलगी, बहीण, माता, सून, भावजय
एकावेळी किती भूमिका करते बाई
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈