सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे
कवितेचा उत्सव
☆ निरोप… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
घेतलास तू निरोप आमचा,
अकालीच जाणे तुझे वाटे !
ठाव मनाचा घेता घेता ,
आठवणींचे मोहोळ मनी उठे!..१
बालरूप ते तुझे आगळे,
सुंदर ,कोमल रूप होते !
तारुण्य तुझे उठून दिसले,
शांत, सद्गुणी तेज होते !…२
आयुष्याच्या त्या वाटेवर,
होती साधी सरळ चाल ती!
वाट अवघड वळणावळणाची,
कधी सुरू झाली कळली नव्हती !.३
जाणीव झाली क्षणभंगुरतेची,
जेव्हा कळली आजाराची व्याप्ती!
निरोपास त्या सामोरे जाण्या ,
ईश्वराकडे मागितली शक्ती !..४
संचित अपुले, भोग ही अपुले,
आपले जगणे ,आपले मरणे!
निरोप घेता मनात येते,
असे कसे हे जगणे मरणे !
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈