सुश्री मंजिरी येडूरकर
कवितेचा उत्सव
☆ लावण्यवती ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆
(गीत प्रकार – लावणी- सवाल – जवाब)
माय मराठी गौरव विशेष स्पर्धेतील उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त कविता.
प्रश्न – ऐका,
मराठी मायेचं कवतिक करशी, कूळ, मूळ मग सांग तिचं,
कुण्या देशीची, कुण्या वेशीची, काय ठावं या बोलीचं? ग ग ग ग
उत्तर –
संस्कृत आहे मूळ तिचं पण, कुळे असती अनेक गं,
म्हाईभटाचं,ज्ञानेशाचं, विनायकाचं अन् कितीक गं, ग ग ग ग
कधी वऱ्हाडी, मालवणी कधी,आगरी अन् अहिराणी गं,
तंजावर अन् झाडी बोली, कधी रांगडी कधी लोणी गं, ग ग ग ग
प्रश्न –
कितीक भाषा भारतीयांच्या, श्रेष्ठ ठरे मग कशी ग ती?
सांग पटदिशी ठरो न अथवा, समद्यामंदी कनिष्ठ ती, ग ग ग ग
उत्तर –
अभंग, ओव्या, भारुड, लावणी,
कधी फटका, कधी पवाडं गं,
कधी विडंबन,भावगीत कधी, शायरीचं ना वावडं गं, ग ग ग ग
कथांचे तर प्रकार किती ते, नीतिकथा, विज्ञान कथा,
वैचारिक अन् अध्यात्मिकही, ललित, विनोदी आणि व्यथा, ग ग ग ग
अलंकार किती या भाषेचे, जरा मोजूनी पहा तरी,
एक जन्म ना पुरेल तुजला, फिरुनि येशील भूमीवरी, ग ग ग ग
काळासोबत बदलत असते, जरा कधी ना हिला शिवे,
सोळा स्वर मूळ चाळीस व्यंजन, दोन स्वरादी, स्वर दोन नवे, ग ग ग ग
एक शब्द घे नमुन्यादाखल, अनेक असती अर्थ इथे,
शब्द किती अन् अर्थ एकचि, वळेल बोबडी तुझी तिथे, ग ग ग ग
नको विचारू पुन्हा प्रश्न हे, मापे सौंदर्या नसती,
कितीक सांगू सारस्वत ते, मुकुटी तियेच्या विराजती, ग ग ग ग
माय मराठी अमर असे गं, गुण गौरव ते वाढवती,
नव्या दमाचे, नव्या स्फूर्तीचे, नवे हिरे बघ लखलखती, ग ग ग ग
प्रश्नकर्ती-
हरले बाई तुझ्यापुढं मी, बोलती माझी अडली गं,
माय मराठी माझी देखिल, आतापासूनि लाडली गं, ग ग ग ग
चला सख्यांनो, करू आरती, माय मराठी भाषेची,
वाजव पेंद्या झांजा तू अन्, जय बोला मराठीची! जी जी र जी, जी जी र जी,जी जी जी….
© सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈