सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

☆ कविता होते… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

(जागतीक कविता दिना निमित्त कविता होणार्‍या श्वासाला अर्पण •••)

एक छोटीशी अळी

असंख्य संकटांचे बोचतात काटे

तेव्हा स्वत:ला सुरवंट बोलते

मग समाजाच्या रूढींच्या कोषात  स्वत:ला बंद करते

मग जाणिव होते स्वत्वाची

मग ••• याच जाणिवेतून

सुंदर रंगीबेरंगी फुलपाखरू भिरभिरते

आणि••••

आयुष्याची कविता होते••••

 

एक परी  आपल्या संसारात विहरते

त्यालाच आपले विश्व मानून•••

प्रेमाची पावती काही काळात मिळते

मातृत्वाची चाहूल लागते•••

आपले रक्त श्वास सारे काही या जिवास ती अर्पण करते

पूर्ण भरताच दिवस ती माता बनते

आणि•••

महिन्यांची कविता होते••••

 

एक छोटेसे फूल

पानाआड कळी होऊन लपते

कुण्या माळ्याची नजर पडून

अवचित खुडू नये म्हणून आपल्या परीने प्रयत्न करते

भरतात पाकळ्या पाकळ्यात रंग

मिळतो एक जादूई स्पर्श

त्या स्पर्शावर सर्वस्व ओवाळून टाकले जाते

आसमंत गंधाने भारते

एक टपोरे फूल झाडावर हसते

आणि•••

दिवसांची कविता होते•••

 

एक कारखाना

कच्च्या आराखड्यास साचात घातले जाते

त्याला पोषक असे अवयव जोडले जातात

सारी जुळणी झाली की मग

त्याला उपकरण सुरू होणारा आत्मा भरला जातो

पॅकिंगचे मेकअप केले जाते

आणि•••

तासांची कविता होते•••

 

एक लक्ष्य•••

त्यासाठी प्रयत्नांची शर्थ होते

आत्मविश्वासाची परिक्षा घेतली जाते

जिद्द कसाला लागते

सातत्य आजमावले जाते

घवघवीत यशाचे शिखर मिळते

त्या क्षणाने भान हरपते

आणि •••

क्षणाची कविता होते•••

 

क्षणा पासून तास

तासापासून दिवस

दिवसा पासून महिने

महिन्यांपासून आयुष्य

सगळ्यासाठी असतो एक ध्यास

त्यासाठी पणाला लागतो श्वास न श्वास

या प्रत्येक श्वासात असते एक कविता

तिला जन्माला घालण्याचा एकसंध होतो श्वास

आणि•••

श्वासाची कविता होते••••

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments