प्रा. सुनंदा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ कवितेचे कवडसे… ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

अर्थाच्या फुलल्या कलिका शब्दांची सजली पाने

रसिकांची दादही मिळता कवितेचे झाले गाणे

*

अर्थाच्या या युगुलाने गगनात विहारा जावे

शब्दांनी क्रौंच व्हावा कवितेने वाल्मिकी व्हावे

*

शब्दांना गोत्र नसावे शब्दांची जात नसावी

शब्दांनी नटली सजली माझी कविताच असावी

*

अक्षरे सांधुनी ओली शब्दांचे राऊळ झाले

अर्थाच्या गाभाऱ्याशी कवितेचे विठ्ठल आले

*

अर्थाच्या दोरा वरुनी शब्दांनी विहरत जावे

कवितेची विजय पताका लहरते पुन्हा सांगावे

*

इंद्राची गौतम गाथा मी अहल्येस सांगावी

कवितेचा राम दिसावा ती शिळा कधी नच व्हावी

*

ओठांची महिरप पुसते  तुज मूक स्पर्श गंधाने

तेथेच फुलावी कविता प्रेमाच्या मृदु शब्दाने

*

अंगणी गाय हंबरता मायेस वासरू लुचते 

वात्सल्य दाटुनी येता मग कवीस कविता सुचते

*

घननीळ सावळा हसला थरथरत्या चांदणवेली

अंगात वीज लखलखता कवितेची राधा झाली

*

इतिहासाच्या पानांनी समरांगण योद्धे कळले

डफ थाप पवाडे गाता कवितेचे डोळे झरले

*

रासात रंगली राधा राधेचा शाम मुरारी

गोपाल शब्दही झाले कविता झाली गिरीधारी

*

शब्दांच्या डेऱ्यामधुनी अर्थाचे घुसळण होई

नवनीत घेऊनी कविता रसिकांस भेटण्या येई

*

रंगात रंगते कविता छंदात काव्यही हसते

लड सप्तसुरांची मिळता नव रसात कविता फुलते

*

व्यासांनी सांगितलेले श्री गणेश घेती लिहुनी

कवितेच्या अंगावरती अक्षरे थांबली सजुनी

*

रुसलेली असते कविता कवी कृष्ण सावळा होतो

राधाच वाटते कविता हलके हृदयाशी घेतो

गझलनंदा

© प्रा.सुनंदा पाटील

गझलनंदा

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments