श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ होळी आहे… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
नकोत काही चिंता खंता
प्रेमभराने भेटूया
होळी आहे चला गड्यांनो
आनंदाने खेळूया …
नकोत दावे उण्यादुण्याचे
नको पवाडे आत्मस्तुतिचे
दिवस आठवत बालपणीचे
ओळखपाळख ठेवत आपण
मुक्त होउनी नाचूया …
कुठून आलो कुठे चाललो
वाढत गेलो जगू लागलो
वेळप्रसंगी हसलो रडलो
घडायचे ते घडून गेले
क्षणभर सारे विसरूया …
ऐलतिरावर पैलतिरावर
बांधत आलो काचेचे घर
विशाल धरतीच्या पाठीवर
उरले सुरले आपल्या हाती
प्रेम जगाला वाटूया …
जगत राहिलो खेळत खेळी
स्वानुभवाने भरली झोळी
ओळखताना मने मोकळी
माळी होऊन कल्पकतेने
बाग फुलांची फुलवूया …
जाणे येणे इथे चालते
कुठे कुणाचे अडून बसते
नवे जोरकस उगवून येते
अंकुरणा-या नव्या पिढीला
मार्ग चांगले दावूया …
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈