श्री सुहास रघुनाथ पंडित
कवितेचा उत्सव
☆ रंगपंचमी विशेष – रंग माझा कोणता ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
☆
रंग तुझ्या आवडीचा तूच मजला देऊनी
तू कसे पुसशी मला रंग माझा कोणता ?
*
कोणत्या रंगात नसतो ? तूच मजला सांग ना
मी जसा दिसतो तुला तोच माझा रंग ना ?
*
नीलवर्णी व्योम आहे श्यामवर्णी मेघ आहे
हरित वर्णी पर्ण आहे धुम्रवर्णी सांज आहे
*
पीतवर्णी ऊन आहे श्वेतवर्णी तेज आहे
रक्तवर्णी मी प्रभा काजळीशी रात्र आहे
*
इंद्रधनु होऊनिया मीच तुजला मोहवितो
चांदण्याच्या लेपनाने रात्र सारी सजवितो
*
माय काळी,कोंब हिरवे,हे कसे रे साधते
मिश्ररंगातून बघसी रोज संध्या रंगते
*
रंग सारे हीच माया जाणूनी घे सत्य माझे
सुख आणि दुःख यांनी,रंगते जगणे तुझे
*
रंग कोणता का असेना अंतरंगी मज स्थान दे
रंग येई जीवनाला सुख अथवा दुःख असू दे.
☆
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈