श्री सुनील देशपांडे
कवितेचा उत्सव
☆ “माणुसकीची गुढी…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆
☆
गुढी उभारू सत्कार्याची
गुढी उभारू शुभकार्याची
मनामनावर पूल बांधुया
गुढी उभारूया स्नेहाची
*
चालत राहो कार्य निरंतर
मृत्युंजय हो कार्य खरोखर
तना मनाच्या अंतर्यामी
गुढी उभारू उंच ढगावर
*
आत्मानंदासाठी उभारू
आत्मोन्नतिचा मार्ग पत्करू
नका विचारू गुढी कशाला
कशास जगणे नका विचारू
*
मना मनावर राज्य मराठी
वर्ष मराठी हर्ष मराठी
मराठमोळ्या भाषेसंगे
अमृतपैजा लावू मराठी
*
उंच काठीसम विचार उभवू
शालू सम समृद्धी नांदवू
कलश संयमाचा त्यावरती
माणुसकीची गुढी उभारू
☆
© श्री सुनील देशपांडे
मो – 9657709640
email : [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈