श्री रवींद्र सोनावणी
कवितेचा उत्सव
☆ पाऊलखुणा… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆
☆
नको नको म्हणताना
असा उगवतो क्षण
आणि पाझरती डोळे,
उगा भारावते मन
*
कोण कोठले प्रवासी ?
असे भेटती वाटेत,
आणि वाटेत चालताना,
जीव गुंतती जिवांत
*
दुःख सांगावे, ऐकावे,
सुख वाटीत रहावे,
अंतरीचे भावबंध,
नकळत जुळवावे
*
असा प्रवास चालतो,
वाट थकते भागते,
ताटातुटीची चाहूल,
उगा मनात सलते
*
मन चरकते आणि
दिशा आडव्या वाटेला,
सुटे हातातला हात
आणि वारु उधळला
*
आता भिन्न, भिन्न वाटा,
आणि कारवा निराळा,
आठवणींच्या झारीत,
उरे स्नेहाचा ओलावा
*
आता पुन्हा कधी भेट ?
नको विचारूस कोणा,
आम्ही न्याहाळीत येऊ,
तुझ्या पाऊलांच्या खुणा…
☆
© श्री रवींद्र सोनावणी
निवास : G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५
मो. क्र.८८५०४६२९९३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈