सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ चाहूल पावसाची… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
☆
मळभ दाटले आभाळी ,
जसे ओथंबलेले मन!
कधी कोसळेल भूवरी,
होईल पाण्याचे सिंचन!…१
*
उन्हाने झाली भुईची काहिली,
सूर्य देवाने आग ओकली!
वारीयाने रोष केला,
अन् सारी सृष्टी होरपळली!…२
*
होऊ दे विजेचा कडकडाट ,
होऊ दे नभी घनदाटी!
वाटते येऊ दे पृथ्वीवर,
धो धो पावसाची वृष्टी !…३
*
तन मन हे शांतवेल!
पावसाची सर ती येता!
भिजून घेईल मनसोक्त,
ही अवघी सृष्टी माता !….४
*
नूर पालटेल तिचा ,
अंगोपांगी येईल झळाळी!
एक पावसाची सर ,
तिला देईल नव्हाळी !
तिला देईल नव्हाळी!….५
☆
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈