☆ कवितेचा उत्सव : कर्ज…. ☆ सौ.माधवी नाटेकर ☆
तू मला भेटतोस
कामाची यादी देतोस
आणि म्हणतोस “वेळ नाही–
मुळीच वेळ नाही कर्जात मी गहाण आहे”
बोलताना कधी विचार केलास?
कुठेतरी,केव्हातरी,कसेही
गहाण आपण सर्वच आहोत
मुलामाणसांच्या प्रेमात
गहाण पडलेले अनेक
मानव जातीच्या उगमापासून
अनंतापर्यंत
नात्यागोत्याच्या देणवळीत
आपण – – –
कायम सर्वच गहाण आहोत
सर्वात सोपं पैशाचं कर्ज
व्याजासह फेडून फिटतं
प्रेमाचं कर्ज वाढत जातं
देतादेता बेरीज करतं
चक्रवाढीने वाढत जातं
तेव्हां त्याचा गुणाकार करतं
ऐकलीस का कधी कहाणी–
मीरा-मधुरा प्रेमाची?
मुरलीधर नाटनागर
मीरेच्या भक्तीत गहाण
तसाच माझ्या प्रेमात—
तू पडला आहेस – –
जन्माचा गहाण
ह्या जन्मी जमणार नाही पण!
पुढच्या जन्मी येशील का!
तुझं-गहाणखत सोडवून घ्यायला?
© सौ. माधवी नाटेकर
9403227288
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
एक सुंदर,प्रेममय गहाणखत.
आपल्या साहित्य चे स्वागत आहे.