सुश्री मंजुषा सुनीत मुळे
कवितेचा उत्सव
☆ “अडाणी —” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
स्वामी तुमची मी
एक अडाणी भक्त
काहीतरी सारखे मागणे
हेच माहिती फक्त ।।
फुले आणुनी तुम्हा सजवते
निगुतीने अन दीप लावते
सोपस्कारही सारे करते
मन दंग परी इतरत्र
मी एक अडाणी भक्त ।।
सवयीनेच मी पूजा करते
काम समजुनी कधी उरकते
वळतच नाही जरी मज कळते
संसारी मन आसक्त
मी खरीच का हो भक्त ?
भक्ती कशी ती जरी न कळते
तरीही का त्या पूजा म्हणते
भक्त स्वतःला म्हणत रहाते
परंपराच ही का फक्त
नावापुरती का मी भक्त ?
हे रोज रोज खटकते
परि काय करू ना कळते
ऐहिकाची बेडी खुपते
जी सतत ठेवी व्यस्त
मी एक संभ्रमित भक्त ।।
पूजेत कमी जे पडते
ते मन मी शोधत जाते
अन् आता एक जाणवते
हवे तेच तर फक्त
मी खरंच अडाणी भक्त ।।
परि आता तुम्हा विनवते
हे मन चरणी वाहते
स्वामी एकच अन् मागते
चरणी जागा द्या मज फक्त
मी तुमची अडाणी भक्त ..
मी तुमची अडाणी भक्त।।
☆
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈