श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 236
☆ फूलपाखरू ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
कळते मजला परि ना वळते
दुःख स्वतःचे स्वतःच गिळते
जेव्हा करते हरिचा धावा
जिवाशिवाशी नाते जुळते
*
शेण मातिने घर सारवले
पोतेऱ्याने ते आवरले
घरात नाही कचरा काडी
तरी कशाने मन हे मळते
*
चरण शृंखला नव्हते तोडे
जगता जगता झिजले जोडे
गोल भिंगरी या पायांना
मृत्यु पासून दूरच पळते
*
हळूच गेली दूर सावली
वाटत होती माय माऊली
मधुर सुखाचा काळ संपता
शीतल छाया कोठे मिळते
*
कायम कष्टी असतो मानव
जीवन वाटे त्याला बेचव
फुलाफुलांवर फूलपाखरू
मजेत उडताना आढळते
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈