सौ. वंदना अशोक हुळबत्ते
कवितेचा उत्सव
☆ बेघर… ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆
☆
बेघर
गांजलेल्या जीवाची
कहाणी कोण ऐकणार ?
आम्हाला हक्काचे छप्पर
कधी भेटणार?
*
रोज जीव शिणतो
निवारा शोधतो
रोज नव्या जागी
नवं घर मांडतो
*
एका पिशवीत संसार मावतो
रस्त्याच्या कडेला जीव हंतरतो
नसते तमा अंधाराची
नसते तमा उद्याची
*
तरी रात्री शिपाई येतो
फाटक्या नशीबाची झडती घेतो
*
अब्रुने सोडचिठ्ठी दिलीच होती
आता
चोराची पदवी मिळाली
*
चार दिडक्या कष्टाच्या
हिसकावून घेतो
चार दंडूक मारून
पसार होतो
*
गरीबाची थट्टा होते
जगण्याची लाज वाटते
इथे
कुत्र्याला घर मिळते
माणुसकी बेघर होते
☆
© सौ.वंदना अशोक हुळबत्ते
संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६ ४१६
मो.९६५७४९०८९२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈