श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 237
☆ मातृदिनानिमित्त – अमृत सिंचन ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
आई म्हणजे माझ्यासाठी झिजणारे ते चंदन आहे
स्तुतिसुमनांना गंध आणण्या करतो मीही चिंतन आहे
*
देव पुजेचा मुहूर्त माझा कधी कधीतर टळून जातो
रोज सकाळी उठल्यावरती माते चरणी वंदन आहे
*
झुंजायाला तयार असते भट्टीसोबत तीही कायम
राख तिची तर झाली नाही जळून होते कुंदन आहे
*
डोळ्यांमधल्या वाचत असते चुका वेदना सारे काही
कधी घालते नेत्री माझ्या जळजळीत ती अंजन आहे
*
मशागतीची सवय लावली मनास माझ्या तिनेच आहे
बीज पेरुनी मग ती करते भरपुर अमृत सिंचन आहे
*
लोक म्हणाया मला लागले अता टोणगा नसे काळजी
ती तर म्हणते तिचा लाडका मी छोटासा नंदन आहे
*
सागरात मी मेरू पर्वत घेउन आलो रवी सारखा
चौदा रत्ने यावी वरती मनात चालू मंथन आहे
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈