डाॅ. निशिकांत श्रोत्री
कवितेचा उत्सव
☆ मातृदिनानिमित्त : आई ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
☆
शीतल मोहक चांदण्यामध्ये चल ना आई जाऊ
घोस खुडूनी नक्षत्रांचे जीवनास नटवू ||धृ||
*
शिशुपणी मजला अपुल्या संगे उद्यानाअंतरी
थकली तरीही घेई उचलुनी मजला कडेवरी
कुठे पांग फेडू गे तव मी तुझाच तर सानुला
तव स्वप्नांच्या पूर्तीचा मी वसा मनी धरला ||१||
*
बालपणीची शुभंकरोति निरांजनीची वात
भीमरूपी अन रक्षण करण्या रामरक्षेचे स्तोत्र
स्वाध्यायी उत्कर्ष घडावा ध्यास कसा विसरू
ध्येय तुझे हे साध्य जाहले दुजा कुणा ना वाहू ||२||
*
वियोग कधि ना तुझा घडावा मनात एकच आंस
सुखशय्येवर तुला पहाणे हाच लागला ध्यास
सारे काही अवगत झाले तुझीच गे पुण्याई
दंभ नको ना अहंकार या संस्कारा तू देई ||३||
☆
© डॉ. निशिकान्त श्रोत्री
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈