सौ विजया कैलास हिरेमठ
कवितेचा उत्सव
☆ “सल…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆
लाटा आल्या परतून गेल्या
वादळ आले उलटून गेले
झाडाच्या मुळांनी माती घट्ट धरून
प्रत्येक संकटाला तोंड दिले…..
करून काळजी चिंता
समस्या कोणती संपते का
कोणीही असो करता करविता
जगणे झिडकारता येते का?
जे आहे जसे आहे
सारे काही निमित्त आहे
संपण्याच्या भीतीनेच तर
जगण्याची खरी ओढ आहे……
सुख आहे दुःख आहे
प्रेम माया जिव्हाळा आहे
राग आणि लोभासोबत द्वेष ही इथे
म्हणूनच प्रत्येकाचे वेगवेगळे जगणे…
तो तसा मी असा
जगणे प्रत्येकाचा वसा
त्याचे त्याला माझे मला
मग दोष का द्यावा कोणी कोणाला??
करणाराच भरणार आहे
देणाराच घेणार आहे
कर्म आहे ज्याचे त्याचे
भोग कुणाला आहेत का चुकायचे.. ?
उगाच लागते सल मना
दोष दूषणे बोल जना
काय देईल कोणी कोणा
प्रत्येकजण तर इथे उणा…
💞शब्दकळी विजया💞
© सौ विजया कैलास हिरेमठ
पत्ता – संवादिनी ,सांगली
मोबा. – 95117 62351
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈