श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 238
☆ मातृदिनानिमित्त – भूक प्रीतिची ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
जीव गुंतला केवळ माझा
फुगली छाती तुटला काजा
*
मन हे माझे येते बहरुन
रोज भेटणे होते चोरुन
नकोच त्याचा गाजावाजा
जीव गुंतला केवळ माझा
*
प्रीत जडाया बहू कारणे
प्रीत सोडुनी नसे मागणे
भूक प्रीतिची माझा राजा
जीव गुंतला केवळ माझा
*
समजुन घे ना माझा हेतू
बंद पापण्या मिटून घे तू
नकोच उघडा तो दरवाजा
जीव गुंतला केवळ माझा
*
सरपण होते चूल पेटली
तवा भाकरी अशी भेटली
पाणी लावा खमंग भाजा
जीव गुंतला केवळ माझा
*
लाल गुलाबी गर्द पाकळी
तुझ्याचसाठी आहे मोकळी
नको मुखी तो आता बाजा
जीव गुंतला केवळ माझा
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈