सौ.ज्योत्स्ना तानवडे
☆ कवितेचा उत्सव ☆ आनंद धन ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
आनंदाचा मळा बहरला
विश्वाच्या या खुल्या अंगणी
लखलख तारे तेज फाकती
चंद्र विकसित नभांगणी !!
रवी तेजाने प्रकाशिला हा
जगताचा भव्य गाभारा
साऱ्या चराचरा उल्हासितो
झुळझुळणारा मंदवारा !!
झाडाझाडातूनी विहरती
मंजुळ गाणारे किती पक्षी
हिरव्या मखमालीवरती
फुले रेखिती सुंदर नक्षी !!
कड्यावरुनी झेप घेतसे
प्रपात शुभ्र जलधारांचा
जीवन फुलते जळातूनी
घडा भरतो सुखस्वप्नांचा !!
निसर्ग किमया पाहुनीया
पारणे फिटतसे नेत्रांचे
झोळी भरुनी मुक्तपणे
ओघळते धन आनंदाचे !!
© सौ. ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈