प्रेमकवी दयानंद
कवितेचा उत्सव
☆ मराठी दोहे…. अर्थात (जीवन तत्त्वज्ञान) ☆ प्रेमकवी दयानंद ☆
☆
सागर जरी,आहे थोर
तरी, तो खारट, नाही गोड
पण,खारट मीठाशिवाय
अन्न, लागत नाही गोड….
चंद्र, किती शीतल, सुंदर, पण
त्याला पाहण्यासाठी, रात्र यावी लागते
सूर्य, चैतन्य-प्रकाश घेऊन येतो, जेव्हा, पहाट होते….
पाना-फुलांनी, बहरलेला वृक्ष
नेहमी, सुंदरच दिसतो
तेथेच असते, पाखरांची वस्ती
जो वठलेला ,सुकलेला,त्याच्या जवळ,नसते कोणी
बिचारा, एकटाच असतो….
हातावर नक्षीसाठी, मेहंदीचे पान, जेवणासाठी केळीचेच,
गुलकंदासाठी, गुलाबाच्याच पाकळ्या,
दस-याला असतो, झेंडूला मान
सावळी तुळस, पूजेत पवित्र, प्रत्येकाचे, वेगळे स्थान….
पाय कुरुप म्हणून, मोर रडत नाही,
आकाशी मेघ येता, पिसारा फुलवून नाचतो,
बेडकाला, रंग रुपाचे काय??
पाऊस येता, तोही आनंदाने खर्जात गातो……
गुन्हा करायला लावते, मानवा,
वेगवेगळी भूक
वागण्यात मानवाची, होऊ नये अशी चूक
सद्गुरु, असावा जीवनी, यासाठीच एक
सन्मार्ग दाखविणारा, तोच असतो निसर्गासम, परोपकारी नेक….
ही नदीमाता, वाहून नेते सारा,
कचरा आणि घाण
तिच्याकाठीच असते, सुपिक
जमिन छान,
ही भूमाताच सर्वांना, अन्न देऊन जगविते,
माफ करुन सर्वांना, अखेर पोटात घेते…
नदीच्या तीरी, असतात तीर्थक्षेत्र,
तेथेच जुळते, भक्तीभावाचे बंध मैत्र,
आप, उदक, जल, तीर्थ किती
पाण्याची रुपे, किती अर्थ
असावे, पाण्यासम परोपकारी,
जीवन करावे सार्थ…
स्वतःच्या सुखासाठी, प्राण्यांना राबवतो, मारतो, माणूस किती स्वार्थी, अन् लोभी आहे
पशु-पक्ष्यांचा, काही विचार नाही मनात,
त्याला वाटते, हा देश फक्त, माझाच आहे……
रंग पांढरा तो पवित्र, अन् काळा तो कसा म्हणता?? आहे
अपवित्र,
अरे, काळा दगड, मंदिराचा
तोच आहे, विठ्ठलाचा, या येथल्या मातीचा,
तोच रंग रातीचा, तोच जलभरल्या मेघांचा, कुहूचा कोकिळेचा….लताचा सर्वत्र…..
भजनात भाव आहे, कीर्तनी
सुंदर आख्यान,
जरी देवाचिये व्दारी तू ,आहे कोठे, तुझे ध्यान??
हातात माळ आहे, मुखाने
घेतोस हरिनाम,
पण,मन भटकते चौफेर, तेथे काय करणार,राम…???…
वृक्षमित्र पुरस्कारासाठी, पक्षी,
झाडे लावत नाहीत
निसर्ग नियमानुसार, जगतात
उगाच, तक्रार करीत नाहीत
वृक्षाजवळ नसतो,भेदभाव
सर्वांनाच,जवळ घेतात
उन, वारा, पाऊस सहन
करुन, पुन्हा नव्याने बहरतात..
☆
© प्रेमकवी दयानंद
संपर्क – तावरे काॅलनी.सातारा रोड.पुणे
मो 9822207068
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈