श्री रवींद्र सोनावणी
कवितेचा उत्सव
☆ निवडणूक… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆
☆
धूम धडाका अजब तडाखा निवडणुकीचा वाजे डंका
चला उठा हो मामा काका जाहिर झाल्या पहा तारखा
*
सावध होऊन घ्या कानोसा पत्रकांवरी नको भरोसा
शुभ कार्याला विलंब कैसा मतदारांची यादी तपासा
*
उमेदवार दाराशी येतील हसून मुजरा तुम्हा घालतिल
“मायबाप” तुम्हाला म्हणतील आशीर्वाद वाकून मागतिल
*
ठणकावून सांगावे त्यांना जोगवा मागत नका फिरू
तुंबडी अपुली भरण्यासाठी नका आम्हाला गृहित धरू
*
सभेतील डरकाळी गर्जना मिळतो टाळ्यांचा नजराणा
झटपट होता तुम्ही धनवान अमुच्या माथी मात्र वंचना
*
उक्ती मनोहर शून्य कृती तळमळतो आहे मतदार
शिकवील तुम्हा धडा चांगला अमुच्या धमन्यातील एल्गार
*
बदल आम्हा अमुलाग्र हवा विचार हा पक्का झाला
या मतपेटीमधून आता, उठतिल क्रांतीच्या ज्वाला
☆
© श्री रवींद्र सोनावणी
निवास : G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५
मो. क्र.८८५०४६२९९३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈