श्री सुनील देशपांडे
कवितेचा उत्सव
☆ “सृजनशीलता…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆
(सावरणारे शब्द या मार्च २००९ मध्ये प्रकाशित माझ्या कविता संग्रहातून )
☆
नभांगणातुन आग ओकितो ग्रीष्म आज बलशाली
तगमग तगमग अवनीवरती लाही लाही झाली
*
सचेतनाला अचेतनाची मरगळ येथे आली
चराचरातून सृजनशीलता आज लोप पावली
*
मृतवत सारी सृष्टी आणिक प्रसन्नता लोपली
शुष्क वृक्ष अन् पान न हाले शुष्क जणू सावली
*
भूगर्भातून जीवन शोषी दिनकर हा बलशाली
भूपृष्ठाची तडतड होऊन तृषार्तता रणरणली
*
जीवन धारा आज जशी की बाष्प रूप जाहली
चराचराची जीवनतृष्णा कुंठित स्तंभित झाली
*
मेघसावळा दिसे अचानक वरुणाची सावली
तुषार काही उधळून नंतर लुप्त कुठे जाहली
*
आगमनाची वर्षेच्या परि वार्ता सुखवून गेली
निद्रित साऱ्या सजीवतेला हलवून उठवून गेली
*
मृद्गंधाच्या लहरीवरती स्वार होऊनी आली
प्रसन्नता सृजनशीलता ठाई ठाई रुजली.
☆
© श्री सुनील देशपांडे
मो – 9657709640
email : [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈