कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 225 – विजय साहित्य ?

☆ प्रतिभेचे चैत्रांगण…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते  ☆

गंध बकुळीचा आहे

अलौकिक साहित्याला

शांता शेळके शैलीने

दिला अर्थ लालित्याला..! १

*

इंदापूर जन्म गाव

खेड मंचर आजोळ

बालपण गेले येथे

शब्दांकीत झाली ओळ.! २

*

लोक संस्कृतीचा ध्यास

लोक साहित्याचा पाया

शब्दां शब्दांवर त्यांच्या

केली शारदेने माया.! ३

*

जन जीवन ग्रामीण

साधं सरळ दर्शन

कारूण्यानं भरलेल्या

साहित्याचं आकर्षण.! ४

*

भाषाभ्यास मराठीचा

जोड इंग्रजी संस्कृत

लेखनाच्या व्यासंगाने

काव्य गीत आलंकृत.! ५

*

 लोकप्रिय गीतकार

भावनाट्य शब्दांकन

भाव भावना नाजूक

हळवेले संवेदन.! ६

*

असा बेभान हा वारा

पाण्या वरच्या पाकळ्या

मेघदूत अनुवाद

उमलल्या शब्द कळ्या.! ७

*

धूळ पाटी आत्मकथा

प्रतिभेची दैवी रेघ

कथा कादंबरी गीत

शब्द सौंदर्याचे मेघ…! ८

*

सूक्ष्म तरल भावना

भाषा शैली ओघवती

शुद्ध, निरागस काव्य

गीत शैली खळाळती..! ९

*

देहभान विसरून

निसर्गात रममाण

उत्कटसा आविष्कार

शब्द लालित्य प्रमाण.! १०

*

कधी कळ्यांचे दिवस

कधी फुलांच्याच राती

आनंदाचे झाड असे

आठवांच्या फुलवाती..! ११

*

गीते सुनीते लावणी

कथा लेखन विपुल

बालकथा बालगीते

घालतात रानभूल..! १२

*

आत्मपर लेखनाची

शांताबाई एक यात्री

नाट्य गीते, भक्ती गीते

कोळी गीते नेक गात्री..! १३

*

बहु आयामी लेखिका

साहित्याचे मानांकन

अभिजात दैवी लेणे

प्रतिभेचे चैत्रांगण…! १४

© कविराज विजय यशवंत सातपुते

हकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments