सुश्री मंजुषा सुनीत मुळे
कवितेचा उत्सव
☆ “भेट…—” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
घन भरले आभाळ
किती आतुर गंभीर
सानुल्याची वाट पाहे
जणू पोटुशी ती नार ….
भार घनांचा वाढता
जणू आता साहवेना
धरित्री एक सखी
देई धीर हळव्या मना …..
वृक्ष-लता फुले पाने
सजे सखीचे आंगण
भारावल्या आभाळाला
जणू डोहाळे-जेवण …..
आतुर वसुंधरा
आता आभाळ भेटीला
त्या आभाळा घेऊन
आला पाऊस हो आला …
आला आला पाऊस आला …
☆
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈