डाॅ. निशिकांत श्रोत्री
कवितेचा उत्सव
☆ आशीर्वच लाभावा… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
(आजच्या पितृदिनानिमित्त)
☆
आकाशीच्या चांदण्यातुनी एक किरण तरी यावा
वैभवासी तात तुमचा आशीर्वच लाभावा ||ध्रु||
*
स्वप्नपूर्तीला तुमच्या सारे अर्पण केले जीवन
माझे मी ना मनी वासना कृतज्ञतेची जाण
पहाटस्वप्नी येउनिया मम अर्थ यशाला द्यावा
आकाशीच्या चांदण्यातुनी एक किरण तरी यावा
वैभवासी तात तुमचा आशीर्वच लाभावा ||१||
*
यशोसुखाचे सुवर्ण राजिव गोंडस आले उमलूनी
सिंचन तुमच्या कष्टांचे हे आज येत फुलुनि
सुगंध तुमच्या तृप्तीचा हा एकवार तरी भोगावा
आकाशीच्या चांदण्यातुनी एक किरण तरी यावा
वैभवासी तात तुमचा आशीर्वच लाभावा ||२||
*
गरुडभरारीसाठी अमुच्या पंखे रुजवलि आशा
व्योमाची भासली न व्याप्ती दिसला नाही अडोसा
स्फूर्तीने तुमच्या मम मनात जोश सदैव भरावा
आकाशीच्या चांदण्यातुनी एक किरण तरी यावा
वैभवासी तात तुमचा आशीर्वच लाभावा ||३||
☆
© डॉ. निशिकान्त श्रोत्री
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈