सुश्री वर्षा बालगोपाल
कवितेचा उत्सव
☆ प्रार्थनेचे फळ… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
☆
वातावरण संस्कारिक , तिने वारसा जपला
बळीराजाच्या अस्तुरीने आज वड पुजीयेला ॥
*
महात्म्य वटपौर्णिमेचे आहे तिला सारे ज्ञात
बळीराजाचा प्राण ‘धरा’ ओतले काळीज त्यात
पूर्ण कर त्याच्या आशा मंत्र मनात प्रार्थियला
बळीराजाच्या अस्तुरीने आज वड पुजीयेला ॥
*
सवाष्णीचे मागणे असे देव कसा हो टाळेल
वरदहस्त कृपेचा मग तिच्या डोई ठेवेल
पूर्ण करण्या हेतू तिचे देव कामास लागला
बळीराजाच्या अस्तुरीने आज वड पुजीयेला ॥
*
पसरल्या पदरात दान श्रद्धेने मागितले
पतीसवे सकलांचे हित त्यात सामावले
मनोभावेची प्रार्थना देव नाराज न करी तिला
बळीराजाच्या अस्तुरीने आज वड पुजीयेला ॥
*
दैन्य जावो तिचे आणि सारे सौख्यात नांदावे
पदरात हेच दान तिच्या आता मी घालावे
नारायणीच्या ओंजळीतून खजिना मोत्यांचा सांडला
बळीराजाच्या अस्तुरीने आज वड पुजीयेला ॥
*
चार मास हा खजिना वेळोवेळी सांडणार
बळीराजाचे कष्ट सारे देवकृपे फळणार
देऊ त्याहून अधिक मिळवू हाच दाखला मिळाला
बळीराजाच्या अस्तुरीने आज वड पुजीयेला ॥
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈