श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 243
☆ बरसात प्रीतीची ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
तिच्या नाजूक ओठांवर तिळाने स्वार का व्हावे ?
दिसाया कृष्णवर्णी तो तरी हे भाग्य लाभावे
*
मलाही वाटतो आता नकोसा जन्म हा माझा
मनी या एवढी इच्छा तिच्या ओठीच जन्मावे
*
सखा होण्यातही आता कुठे स्वारस्य हे मजला
उभा हा जन्मही माझा करावा मी तिच्या नावे
*
कळेना सूर मी कुठला तिच्या गाण्यातला आहे
मला तर एवढे कळते तिचे मी शब्द झेलावे
*
तिच्या कोशात मी इतका असा बंदिस्त का झालो ?
मुलायम रेशमी धागे कसे हे पाश तोडावे
*
तिच्या नजरेतली भाषा कळे नजरेस या माझ्या
तिच्या एकेक शब्दांचे किती मी अर्थ लावावे
*
किती बरसात प्रीतीची नदीला पूर आलेला
मिळालेली मने दोन्ही कशाला पूल बांधावे
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈