कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 227 – विजय साहित्य
☆ त्याची कविता… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
(मात्रा वृत्त..अनलज्वाला)
☆
नाविन्याची, कल्पक मात्रा , त्याची कविता.
चराचराची, मंगल यात्रा
त्याची कविता. १
सुखदुःखाची, करी साठवण,
पद्य तालिका.
शाब्दिक चित्रे,घडवी पात्रा,
त्याची कविता. २
भावमनाची, खळाळ खळखळ
संजीवन ते.
विद्रोहाची,सचैल धारा,
त्याची कविता. ३
मना मनाला, वाचत जाते, टिपून घेते.
लेक लाघवी, लळा लावते,
त्याची कविता. ४
अनुभूतीने, अनुभवलेली,
रसाळ बोली.
काळजातला, अत्तर फाया
त्याची कविता. ५
कशी नसावी,कशी असावी
ठरे दाखला .
पहा वाचुनी, साधी सोपी,
त्याची कविता. ६
गंध मातीचा,रंग मानसी
काजळ कांती.
थेंब टपोरा, शब्द घनांचा
त्याची कविता. ७
कधी माय ती,कधी बाप ती
कधी लेक ती.
नात्यांमधली,नाळ जोडते,
त्याची कविता. ८
पोषण करते, लालन पालन,
घडवी त्याला.
घास भुकेचा, ध्यास मिठीचा,
त्याची कविता. ९
टाळी देते, टाळी घेते, सभा गाजवी .
प्रतिभा वाणी,अक्षर राणी
त्याची कविता. १०
भाव सरीता, रसिक मनाची,
गूज सांगते.
कविराज तो, वही बोलकी,
त्याची कविता. ११
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈