☆ कवितेचा उत्सव ☆ लेखणी माझी ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆
लेखणी दिलदार माझी
शब्द माझे झेलते
आठवांचे अन् आसवांचे
शब्द सारे पेलते
लेखणी अलवार माझी
मृदू होऊन उमटते
कधी यातनांचा गहिवर
घेऊन ती बरसते
लेखणी जाणकार माझी
साऱ्या मलाच जाणते
हासणे नी असणेच माझे
तीच सारे सांधते
लेखणी बेकरार माझी
तिच्याच जवळी ओढते
का कोण जाणे मीही
तिलाच कशी आकर्षिते
लेखणी सोनार माझी
शब्द गंठण घडविते
लेखणी-शब्दांची जोडी
सुवर्णाक्षरी झळाळते
© सौ अश्विनी कुलकर्णी
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈