श्री रवींद्र सोनावणी
कवितेचा उत्सव
☆ प्रकाश वाट… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆
☆
चालत होतो मी एकाकी आयुष्याची वाट
पसरत होता अवतीभवती अंधकार घनदाट
पूर्वाचल कधी निघेल उजळून नव्हते ठाऊक मजला
ठेचाळत धडपडत चाललो रेटीत काळोखाला ||१ ||
*
कर्म भोग हा असा न जाई भोगून झाल्याविना
गिळेल मज अंधार परंतु राहतील पाऊल खुणा
जे होईल ते खुशाल होवो मधे थांबणे नाही
असेल संचित त्याचप्रमाणे न्यायनिवाडा होई ||२ ||
*
निश्चय ऐसा होता उठली नवीन एक उभारी
शीळ सुगंधित वाऱ्याची मज देई सोबत न्यारी
बेट बांबूचे वन केतकीचे पल्याड मिणमिणता दीप
दूर दूर तो प्रकाश तरीही मज भासला समीप हे||३ ||
*
हे देवाने जीवन आम्हा दिधले जगण्यासाठी
उषःकाल तो नक्कीच आहे अंधाराच्या पाठी
मनात आली उसळून तेव्हा उत्साहाची लाट
त्या मिणमिणल्या दीपाने मज दाविली प्रकाश वाट ||४||
☆
© श्री रवींद्र सोनावणी
निवास : G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५
मो. क्र.८८५०४६२९९३