श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 245
☆ विठूचा जागर ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
सौख्यसागरात भक्तिचा वावर
मनोभावे चालू विठूचा जागर
*
ज्ञाना तुका दोघे पंढरी निघाले
जनसमुदाय सोबत चालले
डोळ्यांनी टिपला भक्तिचा सागर
*
एकतारी संगे जोडलेली नाळ
बोलू लागलेत मृदंग नि टाळ
प्रसाद वाटते कोरडी भाकर
*
गरीब श्रीमंत नाही उपहास
विठूच्या भेटीची प्रत्येकाला आस
सारेच माऊली केवळ आदर
*
मन हे प्रसन्न वाटे येथे धन्य
मुखी विठू नाम नाही काही अन्य
देह कंटाळता पसरे चादर
*
तुला भेटण्याची लागलेली ओढ
कष्टाचा प्रवास तरी वाटे गोड
आलोय सोडून शेतात नांगर
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈