श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
☆ कवितेचा उत्सव ☆ राख ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
जळून मेली दहा बालके
कुणाला काय धाड त्याची
माय बाप मोकलून रडती
राख जाहली माया माती
राजकारणी संधी शोधती
निपटविण्या कुणा बोलती
जाऊन घरी ते दर्द दावती
लाज वाटे ना ,फोटो घेती
चवथा स्तंभ ,स्तंभ रंगवी
लिहून टाकील बरेच काही
तळमळ खरी कुठेही नाही
जो तो अपुला मलिदा पाही
देऊन पैसे होइल मोकळे
कारवाईचे सोंग ते बेगडी
पेटवून मग चौकी मेणबत्त्या
श्रद्धांजली ची भाषणे देती
काय पेटविता मेणबत्त्या
घडली आहे ही बालहत्या
सांगतो काहीच होणार नाही
मेले ते आम, खास कुणीच नाही.
© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
चंद्रपूर, मो. 9822363911
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈