कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 231 – विजय साहित्य
☆ कुठे शोधू…? ☆
☆
हरवले सौख्य माझे
कुठे शोधू विठूराया.?
पामराला देशील का ?
तुझी नित्य कृपा छाया. १
*
हरवले गाव माझे
वेळेकाळी धावणारे
संकटांत अगत्याने
पाठी उभे राहणारे ..! २
*
पैसा झाला जगी प्यारा
हरवली नाती गोती.
मातीमोल झाले कारे ?
सुविचार शब्द मोती..! ३
*
परतुनी येईल का
माझे कुटुंब एकत्र
नको द्वेष राग लोभ
नको अहंकारी सत्र…! ३
*
कुठे शोधू विठूराया
माझी कैवल्याची वारी
हरवलो मीच येथे
वेगे संकट निवारी…! ४
*
स्वार्थी जगात धावतो
विसरून हरिनाम
पैसा संपता आठवे
ज्याला त्याला विठू धाम..! ५
*
विसरली बासनात
संत साहित्याची गाथा
सांग कधी कुठे कसा ..?
टेकवावा लीन माथा..! ६
*
युगे सरली अनंत
नच सरे विठू माया
कुठे शोधू चंद्र भागा..?
आणि तुझी छत्रछाया.! ७
*
विसरून सारें काही,
जग जाहले दिखाऊ..!
वारीतले निरामय
चला विश्व डोळा पाहू..! ८
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈