मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 182 – आयुष्य ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 182 – आयुष्य ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

(मोठा  अभंग)

धिराने हाकावी।

आयुष्याची गाडी।

सुख दुःख जोडी।

जुंपोनिया॥1॥

*

सुखाचे सोबती।

सारे जन परी।

समबुद्धी धरी।

चित्ती तुझ्या॥2॥

*

धैर्याने चढावे।

दुःखांचे डोंगर।

सुखाचा सागर।

दिसे तया ॥3॥

*

कानमंत्र ठेवी।

अविरत ध्यानी।

वृत्ती समाधानी।

सदोदित॥4॥

*

आवरी मनाला ।

भारी अवखळ।

जगी मृगजळ।

ठायी ठायी॥5॥

*

ओंडके वाहण्या।

नको मोठेपण।

मुंगीचाच प्रण।

साखरेचा॥6॥

*

अविवेकी संग।

होई वाताहत।

मर्कटाची गत।

आयुष्याची॥7॥

*

हक्क कर्तव्याचा।

जमविता मेळा।

आनंद सोहळा।

आयुष्याचा॥8॥

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈