सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर
कवितेचा उत्सव
☆ स्वागत… ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆
☆
स्वागत
वर्षाबाईचं लगीन ठरलं,
वरूणराजाच्यासंग!
सुपारी फुटली,आवतण देतो,
मेघ,बिजलीच्या संग!
गुलाल उधळीत,समीर जाहला
पहा कसा बेधुंद!
साथ देतसे धरती तयाला, दरवळतो मृदगंध!
सुरू जाहली पहा तयारी,
नटण्या-सजण्याची,
आली टवटवी,अंगे धुवूनी,
वेली-वृक्षांसी!
अलंकार हिरे-मोत्यांचे,
वैभव मिरविती,
नाचत,डोलत आनंदाने,
गुजगोष्टी करती.
शालू पोपटी,नेसून सजली
अवघी ही सृष्टी,
रूप खुलविते ,चोळीवरची,
रंगबिरंगी नक्षी!
किलबिल किलबिल करती पक्षी,वाजे शहनाई,
तडतड तडतड घुमला ताशा ,
घाई मुहुर्ताची!
कडकड,चमचम,बिजली या, लवलवते मंडपी !
लगीन लागलं आकाशी अन्
जलधारा अंगणी,
स्वागत करूया,आनंदाने
झेलूया पावसाच्या सरी!
☆
© सुश्री प्रणिता खंडकर
संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.
ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈