श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

आषाढी एकादशीचे दंडवत…  श्री सुहास सोहोनी ☆

अक्कड बक्कड, सख्खे भाऊ

दोघांनी ठरवलं, फिरायला जाऊ

अक्कड म्हणाला, तू वाट दाखव

बक्कड म्हणाला, तू वाट दाखव

*

जायचं कुठे, ठरलंच नव्हतं

रस्ता चुकायचं, कारणच नव्हतं

चाल चाल, चालत राहिले

पाय थकले, मोडुन गेले

*

भरकटल्यावर, संवाद संपला

कारण नसता, विवाद झाला

अक्कड म्हणे, डावीकडची वाट

बक्कड म्हणे, उजवीकडचा घाट

*

चालतच राहिले, अक्कड बक्कड

वाटेत त्यांना भेटला कक्कड

डोळ्यात हुशारी, डोक्यात अक्कल

वागण्या-बोलण्यात एकदम फक्कड

*

थकलेल्या जीवांना आधी

कक्कड देई कांदा भाकर

सुकलेल्या कंठांना सुखवी

थंडगार पाणी लोटाभर

*

कक्कड झाला गुरू तयांचा

अक्कड बक्कड झाले चेले

कक्कड सांगे मेख आतली

अक्कड बक्कड बघत राहिले

*

प्रथम ओळखा स्वतः स्वतःला

जाणुन घ्या तुमच्या शक्तीला

अंतर्मन तू असशी अक्कड

बहिर्मनाचा धनि तू बक्कड

*

स्वभाव भारी चंचल तुमचे

एका जागी नाही बसणे

लगाम तोडून सैरावैरा

भरकटणे अन् धावत सुटणे

*

कुठे जायचे, ठाऊक नाही

वाट कोणती, माहित नाही

हात मिळवुनी जाल पुढे तर

दैवदत्त मग मिळेल काही

*

चालत गेले चालत गेले

रात्री सरल्या दिवस संपले

मैलोगणती अंतर सरले

दैवाने परि काहि न दिधले

*

निराश झाले भाऊ दोघे

तोच कानि ये ध्वनि लयकारी

मृदुंगासवे टाळ वाजला

विठुनामाची हो ललकारी

*

बघता बघता गुंतुनि गेले

नकळत दिंडित सामिल झाले

अबीर बुक्का कुणी लावला

उतावळी जाहली पाउले

*

मंदिरि येता मस्तक लवले

नेत्रामधुनी अश्रू झरले

एक विचारे, एक मनाने

दो बंधुंचे सख्य जाहले

*

दर्शन घेता मुखचंद्राचे

पारावार न आश्चर्यासी

अविश्वासे स्थितीहि अवघड

उभा विटेवरि साक्षात कक्कड !!

उभा विटेवरि साक्षात विठ्ठल !!!

☘️

© सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments