कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 232 – विजय साहित्य
(२३ जुलै १८५६ – १ अगस्त १९२०)
☆ ज्ञानयज्ञ… ☆
☆
रत्नागिरी जिल्ह्यामधे
जन्म चिखल गावात
लाखों मने संजीवित
लोकमान्य समाजात…! १
*
ख्याती निर्भय विद्यार्थी
बुद्धी चौकस प्रखर
झाले निष्णात वकील
नाव बाल गंगाधर….! २
*
जन्मसिद्ध हक्क माझा
स्वराज्याचा अधिकार
थोर विचारी तत्वज्ञ
वाणी अमोघ साकार…! ३
*
स्वराज्याची चळवळ
चतुसुत्री बहिष्कार
दिले राष्ट्रीय शिक्षण
स्वदेशीचा अंगीकार…! ४
*
वंगभंग आंदोलन
शक्तीमान संघटना
होमरूल लीग क्रांती
जन जागृती चेतना…! ५
*
काल गणना पद्धती
आलें टिळक पंचांग
गणिताचे अभ्यासक
दृष्टी शोधक अथांग…! ६
*
ग्रंथ गीतारहस्याने
केला जागृत भारत
ओरायन’ ’आर्क्टिक ने
वैचारिक मशागत….! ७
*
सुरू केसरी मराठा
वृत्तपत्र संस्थापक
हिंदू मुस्लिम ऐक्याचे
परखड संपादक…! ८
*
लावी ब्रिटिशांना घोर
लोकमान्य ही लेखणी
डोके ठेवा रे ठिकाणी
दिला इशारा अग्रणी….! ९
*
तन मन धन दिले
देशसेवा अलौकिक
देशभक्त पत्रकार
ग्रंथ निर्मिती मौलिक…! १०
*
लखनऊ कराराने
एकसंध केला देश
लोकमान्य टिळकांचा
देशभक्ती हाची वेष…! ११
*
उत्सवाची परंपरा
सुरू शिवजन्मोत्सव
गावोगावी गणपती
भक्ती शक्ती महोत्सव…! १२
*
कार्य शैक्षणिक थोर
केला शिक्षण प्रसार
संस्थापक प्रशालेचे
केला ज्ञानाचा प्रचार..! १३
*
लाल बाल पाल यांनी
घडविला इतिहास
दुष्काळात टिळकांनी
पुरविला मुखी घास…! १४
*
वैचारिक मतभेद
वाद आगरकरांशी
ध्येयवादी विचारांनी
लढा दिला ब्रिटिशांशी…! १५
*
गाणी व्याख्यान मेळ्यांनी
जोपासली लोककला
लोकोत्तर कार्य केले
पत्रकार योगी भला…! १६
*
सरदार गृहामध्ये
स्फूर्ती देवतेचे रूप
आज त्यांची पुण्यतिथी
तेजाळल देहधूप…! १७
*
लोकमान्य टिळकांचा
शब्द शब्द अंतरात
ज्ञानयज्ञ स्वराज्याचा
प्रज्वलित दिगंतात…! १८
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈