श्री नितीन सुभाष चंदनशिवे
कवितेचा उत्सव
☆ “धोक्याच्या वळणावरती —…” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆
☆
तुझा सारा गाव झोपला की,
ये भेटायला मागच्या दारानं
पण गाव उठायच्या आत
माघारी जाशीलच याची शास्वती
मी देत नाही
*
अल्लड वाऱ्याला जीव लावणं
बरं नव्ह बाई,
या वयाला विश्वासाची पावती
देता येत नाही
*
मिठीत घेणारा वारा गार असेलही
पण तो झोंबणारच नाही याचा
भरवसा मी देत नाही
*
संसाराच्या गप्पा बऱ्या वाटतात
पण संसारात गप्पाच असतील
याची खात्री मी घेत नाही
*
थांब म्हणावं पावलांना
या वयात पोरी
हा बाजिंदपणा बरा नाही
हा वारा काही खरा नाही
*
आणि तुझा गाव झोपलाच असेल
यावर माझा विश्वास नाही.
कवी : नितीन चंदनशिवे. (दंगलकार)
© श्री नितीन सुभाष चंदनशिवे
संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.
मो 7020909521
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈