सुश्री शीला पतकी
कवितेचा उत्सव
☆ “अप्सरा आsss ली…” ☆ सुश्री शीला पतकी ☆
☆
सुंदरा कुठे अवतरली मनामध्ये शिरली
हृदयात कशी पाझरली जणु मधात ती विरघळली
*
केश कमान झाकती भव्य कपाळ
त्या कोरीव भुवया तलवारीचा जाळ
ते शराब डोळे पापण्यांचा पेलती भार
मन पुसे मनास हि कोण असे हो नार
*
ती सरळ नासिका चाफेकळी जणू
नथनीचा तो भार
ते अधर मुलायम गर्द गुलाबी
पाहता होई मग कहर
*
त्या गौर लालसर कानावर
ती नाजूक कांचन वेल
कानाचा पाळीत झोके घेती
ते रत्नजडित ग फुल
घालती भूल
सखे ग मजला
*
ती उंच मान कमनीय जणू
डोकावून शोधते नजर
ते गाल गुलाबी रंग केतकी
त्या बटा वदन पहारेदार
*
ते उरोज चोळीस करिती तंग
पाहता झालो मी दंग
ती कमर कमनीय सुडोल बांधा
आव्हान देई मज उघडा खांदा
*
ते नाजूक करकमल
मेहंदीचा हात नक्षीदार
ते कांकण किण किण
कानास नाद सुमधुर
*
ती पाऊले देखणी
रंगली लाल अळत्यात
ते पैंजण नाजूक करती नाद तो खुळा
जीव हा झाला हो बावळा
*
ती किंचित वळली हृदयाचा चुकला ठोका
तो काळा केशसंभार आहा मोकळा
मी गुरफटलो बांधलो केशकलपात
हरवलो तिच्या डोळ्यात अडकलो पुरता
*
ती रंभा उर्वशी कोण आप्सरा
मजसाठी धरेवर आली अन्
सवे तिच्या हो मलाच घेऊन गेली
*
मी जागा झालो स्वप्न भंगले
डोळ्यावर झापडं होती
कुठे उर्वशी कुठे न रंभा
ती भार्या उठवीत होती
☆
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈