श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 184 – माझे माहेर माहेर ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆
(अष्टाक्षरी रचना)
☆
माझे माहेर माहेर।
जणू सुखाचा सागर।
अशा थकल्या मनाला।
भासे मायेचे आगर॥
*
माय माऊलीचे प्रेम
जसा फणसाचा गर।
तिच्या शिस्तीच्या धारेला
शोभे वात्सल्याची जर॥
*
आंम्हा मुलांचे दैवत
बाबा आदर्शाची खाण ।
लाखो बालकांचा दादा
त्यांना साऱ्यांचीच जाण॥
*
नाही आपपर भाव
संस्कारांनी शिकविले।
हवी मनाची श्रीमंती
अंतरात रुजविले॥
*
प्रिती भावा बहिणीची
बंध रेशीम धाग्यांचा ।
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे
मंत्र यशस्वी नात्यांचा॥
*
असे माहेर लाखात
जणू बकुळीचे फूल।
देव दिसे माणसात
देई संकटांना हूल।
☆
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈