श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ वीर… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
वा-यावरी वराती नसतात निघत काही
पण बातम्या कशा या येतात उडत काही
*
पोथीत वाचलेले सत्यात आणण्याला
देवा समोर दुबळे बसतात जपत काही
*
होतात वीर योद्धे आधार भेटला की
करताना वार वर्मी पदरात लपत काही
*
बुजगावणीच येथे नखरेल भाव खाती
सोडून राखणीला पळतात दडत काही
*
टुकडे गिळायला ही झुकतात लाळघोटे
झालेत भाट तेव्हा आलेत जगत काही
*
रस्त्यात खूप गर्दी झालीय शोषितांची
खिडकीतुनीच धनको बसलेत बघत काही
*
लाटूनिया खजिना झालेच साव होते
पसरून पाय दोन्ही पडलेत कुजत काही
*
देवा तुझ्या घरी पण कसलाच न्याय नाही
भुलवून भक्त ढोंगी झालेत संत काही
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈