सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “स्वरधुंद पाऊस…—” ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

पाऊस येई घेऊन संगे सप्तसूर मनमोही 

स्वतःच धरुनी ताल आणि हा आळवितो आरोही ।।

 *                  

कधी वाटे हा अहीरभैरव, गुणगुणतो कानाशी 

कधी आळवे संथपणे जणू, गुजरी तोडी खाशी ।।

*

थांबवुनी सूर्यास ऐकवी, मुलतानी, मधुवंती 

भीमपलासी मारीत ताना, फिरे स्वत:च्या भवती ।।

*

मधेच होई उदास का हा, पडे जणू एकला 

सोबत येई पूरिया आणि मारवाही साथीला ।।

*

भान नाही या दिनरातीचे, स्वरात किती हा दंग 

जग रंगे त्या मालकंसी वा, भूप-यमनी हो गुंग ।।

*

कधी कधी परि होई नाहीसा, विसरून सूरच सारे 

जो तो शोधीत त्याला, होती सैरभैरही वारे ।।

*

आर्त होऊनी विश्वच मग हे गाई मेघमल्हार 

विसरुनी रुसवा मनीचा आणि बरसे फिरून ही धार ।।

*

स्वत:च उधळी मैफल परि कधी, होत अती बेसूर 

सूर सृष्टीचे वाहून जाती, अश्रूंना ये पूर ।। 

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Bramhanand P Pai

Wah.Kavita chanch.