सुश्री कावेरी रोहिदास सुतार
कवितेचा उत्सव
|| शब्द || सुश्री कावेरी रोहिदास सुतार ☆
☆
शब्द जर अर्थाना नेहमीच
पूर्णपणे न्याय देऊ शकले असते,
तर नात्यांमध्ये गैरसमज
कधी निर्माण झालेच नसते…
*
शब्द जर स्वतःचा तोल
स्वतःच सावरू शकले असते,
तर मनावर आघात
कधी झालेच नसते…
*
शब्द जर दुःख, वेदना, यातना
व्यक्त करू शकले असते,
तर डोळ्यांमध्ये अश्रू
कधी आलेच नसते…
*
शब्द जर स्वतःच्या मर्यादा
स्वतःच ठरवू शकले असते,
तर नात्यांमध्ये दुरावे
कधी आलेच नसते…
☆
© सुश्री कावेरी रोहिदास सुतार
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈