श्री रवींद्र सोनावणी
कवितेचा उत्सव
☆ माळिण गावाची दुर्घटना… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆
☆
माळिण नव्हती वैरिण माझी, होती खरी मैत्रीण
मला भासले, करीत होती प्रगती सर्वांगीण
सह्याद्रीच्या कुळातला मी, फार जुना डोंगर
परंतु माझ्या शरीरी नव्हता कातळ तो कणखर
*
घट्ट मातीचा पुष्ट देह हा, वृक्षवल्लीनी सजला
कुशीत माझ्या माळिण वस्ती रक्षित होतो तिजला
पुत्रांनी पण तिच्याच, अवघी वनराई कापिली
तोडुन लचके या देहाचे, भूमी सपाट केली
*
तिथे बांधला त्यांनी जलाशय, पाणलोट अडवुन
कसाबसा मी उभा राहिलो भुसभुशीत होवुन
तशात पडता अविरत पाऊस, तोलच माझा ढळला
कोसळलो मी, माळिण गावच नामशेष झाला
*
कितिक माणसे मम वजनाने गुदमरून गेली
आठ-दहा जी वाचली पुरती जायबंदी झाली
या घटनेमधी सांगा, माझा काय असे दोष ?
न्याय निवाडा तुम्ही करावा होऊन न्यायाधीश
*
डोंगरमाथे आणि पायथे, सोडून द्या मोकळे
नकोच तेथे लोकवस्ती आणि नकोत शेतमळे
वाचवाल जर पर्यावरण तुम्हीही वाचाल
स्वच्छ शुद्ध या हवेत सारे, श्वास मोकळे घ्याल
☆
© श्री रवींद्र सोनावणी
निवास : G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५
मो. क्र.८८५०४६२९९३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈