श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ नोंद… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
संकटकाळी वै-यालाही घालत होती साद माणसे
जन्मभराच्या उपकारांची ठेवत होती नोंद माणसे
*
मनासारख्या घडल्या गोष्टी बदलायाला जगणे सगळे
त्याच मोजक्या आठवणींची विसरत नव्हती याद माणसे
*
घडवायाला नव्या पिढीला जुनेजाणते झिजले होते
त्यांच्यामधल्या संस्काराना देत राहिली दाद माणसे
*
अतूट नाती माया ममता लळा जिव्हाळा दिलाय ज्यांनी
असल्या त्यांच्या औदार्यातच शोधत होती मोद माणसे
*
बदलत गेला जसा जमाना तशी धारणा बदलत गेली
काळासोबत वावरताना नकळत झाली बाद माणसे
*
ठोकत पाचर काम चांगले विरोधकांचे बंद पाडाण्या
चुकलेल्याना खिजवायाला शोधत बसती सांद माणसे
*
साधकबाधक देत दाखले संशोधक तर ठरून जाती
पुराव्यातले बाढ पुराणे चिकटवणारी गोंद माणसे
*
थांबवण्याला पडझड इथली हाती काही उरले नाही
फाजील वेडे नुकसानीचे करू लागली नाद माणसे
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈