प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी
कवितेचा उत्सव
☆ तिरंगा… 🇮🇳 ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆
(तिरंगा 🇮🇳 — शीर्षक एकच पण कविता दोन… त्याही अगदी भिन्न )
☆
[ एक ]
दुनियेत होतो गाजावाजा
हसरा तिरंगा भारत माझा ll ध्रु ll
*
हिम मस्तकी शोभे किरीट
हिंद सागर चरण धूत
पश्चिमेस किल्ले गड कोट
राबतो शेतात जेथे बळीराजा ll 1 ll
*
अनेक भाषा अनेक पंथ
कैक विद्वान अनेक संत
लडले झगडले बहू महंत
सोज्वळ प्रांजळं ऐसी प्रजा ll 2 ll
*
वेद विद्या कला पारंगत
रामायण अन महाभारत
नालंदा तक्षशिला संस्कृत
स्वातंत्र्याची बलिदान पहाट
असा दुनियेत गाजावाजा ll 3 ll
*
कीर्ती लोकशाहीची जगात
प्रजासत्ताक राज्य जोमात
भारत माझा असेल जीवात
प्रसिद्धीचा मुकुट राजा ll 4 ll
✒️
☆
[ दोन ]
असूनही सनाथ झाले अनाथ
माझा तिरंगा हा वृद्धाश्रमात
*
जगत पालक कृष्ण जन्मे बंदिवासात
पालक करी नोकरी मोठया शहरात
नशीब त्यांचे कोण कुणाला भार
माझा तिरंगा असे पाळणा घरात
*
किती जीव जगती हाल अपेष्टात
मूक बधीर कोणी अंध अंधारात
कोणी विकलांग अपंग जगात
माझा तिरंगाही त्यांच्याच दारात
*
किती गरीबी किती दैन्य मांडू
झोपडपट्टीत पोटासाठी भांडू
सरहद्दीवरती किती रक्त सांडू
हिंदवी स्वराज्य हा त्यांच्याच प्राणात
माझा तिरंगा त्यांचाच हातात
☆
© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी
ज्येष्ठ कवी लेखक
मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈