श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 252
☆ मळभ दाटते… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
अंधाराला आधाराची गरज भासते
भयान शांती मनात माझ्या भिती साठते
*
भिती कशाची काही वेळा समजत नाही
कारण नसता स्वतःभोवती मळभ दाटते
*
निसर्ग राजा असा कसा तू सांग कोपतो
हादरते ही धरणी अन आभाळ फाटते
*
तडफडून हे मासे मरती तळे आटता
सूर्य कोपता पाणी सुद्धा बूड गाठते
*
भाग्यवान हे रस्ते आहे देशामधले
वृष्टी होता रस्त्यावरती नाव चालते
*
झेड सुरक्षा नेत्यांसाठी बहाल होता
देश सुरक्षित आहे त्यांना असे वाटते
*
बलात्कार हा झाल्यानंतर जागे होती
विरोधकांची नंतर येथे सभा गाजते
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈